पोस्ट ऑफिसच्या कोणत्या स्कीम वर किती व्याज ? 1 जानेवारीपासून होणार सुधारणा

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय निवडत असता. अशा गुतंवणूकदारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीपासून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांवरील व्याज दरात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी व्याजदराबद्दल माहिती असणे गरजेचे असते . पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD), आरडी (RD), पीपीएफ (PPF) यांसारख्या लोकप्रिय योजनांवर बँकेपेक्षा चांगले व्याज दर मिळू शकतात. तर चला जाणून घेऊयात कोणत्या योजनेवर किती व्याज मिळणार .

विविध योजनांवर व्याजदर

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विविध योजनांवर व्याज दर वेगवेगळे आहेत. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% दर आहे. 1 वर्षाच्या मुदत ठेवावर 6.9%, 2 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.0%, 3 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.1% दर उपलब्ध आहे. 5 वर्षांच्या मुदत ठेवावर 7.5% व्याज मिळते, तर 5 वर्षांची आवर्ती ठेव योजना 6.7% व्याज देते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत 8.2% व्याज मिळते, तसेच मासिक उत्पन्न योजनेत 7.4% दर लागू आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेवर 7.1% दर, सुकन्या समृद्धी खात्यावर 8.2%, आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व किसान विकास पत्रांवर 7.5% दर आहे. महिलांसाठी विशेष असलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर देखील 7.5% व्याज दर मिळतो. यावरून स्पष्ट आहे की पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये विविध व्याज दर आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

व्याजदरात सुधारणा फायदेशीर ठरणार

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही अशी योजना आहे ज्यात दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळते. यामध्ये एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये ठेवता येतात. 5 वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.4% दराने व्याज मिळते. तसेच सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवरील व्याज दरात सुधारणा करते. त्यामुळे 1 जानेवारीला व्याज दरात होणारी सुधारणा तुमच्या गुंतवणुकीला अधिक फायदेशीर बनवू शकते.