बुलढाणा प्रतिनिधी| संग्रामपूर ग्रामस्थांच्या वतीने महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच प्रवासी निवारा बांधण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. तरीही त्यांनी ८ दिवसात त्या बद्दल कोणीतीही दखल घेतली नाही. प्रवासी निवारा आणि महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने गावातील महिला तसेच विद्यार्थिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आज संग्रामपूर बस स्टँडवर ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावर संताप व्यक्त केला.
दरम्यान ‘लवकरात लवकर प्रवाशी निवारा बांधून न भेटल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करू’ असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींकडून देण्यात आला आहे. तेव्हा जाहिरातीतून स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृह मागणीची दाखल घेतली जाणार का? असा सवाल तूर्तास अनुत्तरित आहे.