Pune ring road : पुण्याच्या विकासात भर घालणाऱ्या अत्यंत महत्तवाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. रिंग रोडचे लवकरच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. याबाबत एका पत्रकार परिषदेचे आयोज़न करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी रिंग रोड बाबत महत्वाची माहिती दिली आहे.
यावेळी माहिती देताना डुडी यांनी सांगितले की, रिंग रोडसाठी (Pune ring road) पश्चिम भागात ९६ टक्के जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची त्याबाबत लवकरच आढावा बैठक होणार आहे. त्यात भूमिपूजन कधी होणार हे निश्चित होईल. त्यामुळे रिंग रोडचे लवकरच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे ते म्हणाले.
90 टक्क्यांपेक्षा जास्त जमीन संपादित (Pune ring road)
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती १६९ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहे. रिंग रोडसाठी आवश्यक ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पश्चिम भागात जमीन संपादित झाली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
नवे सरकार स्थापना झाले तरीही रिंग रोड प्रकल्प रखडला असल्याबद्दल प्रश्न विचारला असता डुडी यांनी सांगितले की, ‘रिंग रोड हा पुण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी पूर्व भागात ८२ टक्के भूसंपादन झाले असून, १८ टक्के संपादन (Pune ring road) बाकी आहे. पश्चिम भागात ९६ टक्के भूसंपादन झाल्याने उर्वरित चार टक्के संपादन बाकी आहे. त्याचे काम पश्चिमेच्या बाजूने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक लवकरच होणार आहे. त्या वेळी भूमिपूजन कधी करायचे हे निश्चित होईल.’ अशी माहिती त्यांनी दिली.