जम्मू-काश्मीरमधील सौंदर्याने नटलेल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं असून, महाराष्ट्र आणि विशेषतः पुणेकरांनाही या हल्ल्याचा मोठा फटका बसला आहे.
या हल्ल्यात पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुली मात्र सुदैवाने बचावल्या आहेत. हल्ल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
विशेष विमानाने अडकलेल्या पर्यटकांची सुटका
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील सुमारे 150 ते 200 पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता मुंबईहून श्रीनगरकडे विशेष विमान रवाना होईल आणि तेथून अडकलेल्यांना घेऊन पुण्यात आणले जाईल.
“हे सर्व प्रयत्न अगदी तातडीने सुरू आहेत. आम्ही सातत्याने श्रीनगरमधील जिल्हाधिकारी आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. विशेषतः गृह विभागाचे एक मराठी अधिकारी सध्या श्रीनगरमध्ये कार्यरत असून, त्यांच्या मदतीमुळे आमचा समन्वय अधिक सुलभ झाला आहे,” असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची पार्थिवं आज सायंकाळी सहा वाजता विशेष विमानाने पुण्यात आणली जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मुंबईतील मृत पर्यटकांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजता मुंबईला पोहोचणार आहेत .
मंत्री मोहोळ ऍक्शन मोड वर
मंत्री मोहोळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सतर्क आहेत. “लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही विशेष काळजी घेत आहोत. अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी घाबरू नये, आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असं आश्वासनही त्यांनी दिलं.
हेल्पलाइन नंबर जारी
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन नंबर 020-26123371 जारी केला आहे. नातेवाईकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मदतीसाठी माहिती मिळवू शकतात.
पहलगाम हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून, दरवर्षी हजारो पर्यटक इथे भेट देतात. मात्र, मंगळवारी दहशतवाद्यांनी इथे अंदाधुंद गोळीबार करून पर्यटकांचा जीव घेतला. हल्लेखोरांनी धर्म आणि नाव विचारून पर्यटकांना टार्गेट केल्याचं समोर आलं आहे. हा हल्ला देशभरातून निषेध करण्यात येत आहे.




