Pune Traffic Police : हेल्मेट घालण्याची जनजागृती करायला पोलिसांनी लढवली शक्कल; चौकात झळकले बाहुबलीचे पोस्टर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pune Traffic Police) पुण्याबद्दल बोलायचं झालं की, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन स्थळे, खाद्यसंस्कृती आणि पुणेरी पाट्यांचा उल्लेख होतोच. ‘पुणे तिथे काय उणे..’ म्हणतात ते काय उगाच नाही. आजपर्यंत तुम्ही पुणेकरांचे कितीतरी किस्से ऐकले असतील. कमी शब्दात खतरनाक अपमान करण्यासाठी पुणेकर जगप्रसिद्ध आहेत. तर पुणेरी पाट्या.. त्यांच्याबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात. विविध विषयांवर या पुणेरी पाट्या लागलेल्या दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे बरेच फोटो व्हायरल होतात. अशातच आता पुणेकरांमध्ये हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करायला पोलिसांनीसुद्धा पुणेरी पाटीचा आधार घेतला आहे.

पुणे पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल (Pune Traffic Police)

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस कायम काही ना काही युक्त्या लढवताना दिसतात. अशातच आता पुणे शहरातील वाहतूक पोलीसांनी पुणेकरांमध्ये हेल्मेटसंदर्भात जनजागृती निर्मितीसाठी एक अनोखा आणि मजेशीर फंडा वापरला आहे. पोलिसांनी हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे शहरात चौकाचौकात होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगला आपण पुणेरी होर्डिंग बोलू शकतो. कारण, या होर्डिंगच्या माध्यमातून एका अनोख्या पद्धतीने पोलिसांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

काय लिहिलंय होर्डिंगवर?

पुण्यात बरेच लोक विना हेल्मेट गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे अनेकदा पोलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर चालान कापण्याची मोहिम राबवतात. दरम्यान, बऱ्याच चालकांसोबत त्यांचे वाद होतात. (Pune Traffic Police) दंड आकारून देखील बरेच लोक अजूनही हेल्मेट घालत नाहीत.

अशा दुचाकी चालकांसाठी सध्या पोलिसांनी पुण्यात जनजागृती करणारे होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगवर बाहुबलीचा फोटो लावण्यात आला आहे. त्याच्या बाजूला लिहिलंय, ‘बाहुबली जर हेल्मेट घालत असेल तर आपण का लाजतो..? हेल्मेट वापरा सुरक्षित राहा…’.

अपघातांचे प्रमाण

पुणे शहरात जवळपास प्रत्येकाकडे वाहने आहेत. त्यामुळे वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातांचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. मात्र असे करूनही अजून बरेच बाईकस्वार अपघाताच्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत. (Pune Traffic Police) त्यांना अद्याप हेल्मेट घालण्याचे गांभीर्य आलेले नाही. म्हणूनच पोलिसांनी सक्तीपेक्षा जनजागृतीचा पर्याय निवडला आहे. या होर्डिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर अनेकांनी ‘सही पकडे है’, ‘एकदम बरोबर’ अशा कमेंट केल्या आहेत.