Raksha Bandhan 2024 : राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता ? काय आहे या दिवसाचे महत्व ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Raksha Bandhan 2024 : भारत हा जगभरात त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृती साठी ओळखला जातो. भारतीय संस्कृती मध्ये सण आणि उत्सवाला खूप महत्व आहे. श्रावण महिना सुरु झाला की सणांची रीघ लागते. त्यातही भारतात भाऊ -बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सुरु होतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कधी आहे ? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ? चला जाणून घेऊया …

रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते. हा पवित्र सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

रक्षा बंधन 2024 तारीख

यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रावण पौर्णिमा आणि श्रावण सोमवारचा राखी उपवास यांचा अप्रतिम मेळ आहे. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचाही शुभ संयोग होईल.

मुहूर्त

रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 01.30 ते रात्री 09.08 पर्यंत राहील. रक्षाबंधनाचा दुपारचा मुहूर्त दुपारी 01:43 ते 04:20 पर्यंत असेल. तर रक्षाबंधनासाठी प्रदोष कालचा शुभ मुहूर्त 06:56 ते रात्री 09:08 पर्यंत असेल.

भावाला टिळक आणि अक्षता का लावले जाते

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी हातावर राखी बांधण्यापूर्वी भावाच्या कपाळावर टिळा आणि काही अक्षता लावतात. सनातन धर्मात तांदूळ हे अत्यंत पवित्र अन्न मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार कच्चा तांदूळ टिळ्यामध्ये मिसळून कपाळावर लावल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे नकारात्मक शक्ती टिकत नाही.

रक्षाबंधनाशी संबंधित द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा

रक्षाबंधन हा सण अगदी पौराणिक काळापासून साजरा केला जातो. असे म्हणतात की महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला होता. त्यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.त्यानंतर श्रीकृष्णाचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा एक छोटा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला. त्यामुळे श्रीकृष्णाचा रक्तस्त्राव थांबला. ज्या दिवशी ही घटना घडली तो श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला.