अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर भक्तांच्या आध्यात्मिक यात्रेला नव्या युगाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. श्रद्धेच्या या मार्गात आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणार असून मंदिराच्या परिसरात एक विशेष भूमिगत सुरंग तयार करण्यात आली आहे. ही सुरंग केवळ परिक्रमा मार्गाचा भाग नसून, भक्तांची सोय आणि सुरक्षा लक्षात घेता उभारण्यात आलेली एक अद्वितीय सुविधा आहे.
राम मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या मुख्य सिंहद्वाराजवळ ही सुरंग १५ फूट खोल आणि ८० मीटर लांबीची आहे. भव्यतेने आणि बारीक कामगिरीने बनवलेली ही सुरंग थेट ८०० मीटर लांब परिक्रमा मार्गाशी जोडली गेली आहे. या मार्गावर एकाच वेळी सुमारे दीड लाख श्रद्धाळू परिक्रमा करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येमध्ये भाविकांच्या स्वागतासाठी होत असलेली ही तयारी अत्यंत भव्य आणि सुव्यवस्थित आहे.
सुरंग तयार करताना राजस्थानमधून आणलेल्या २.७ टन वजनाच्या नक्षीदार दगडांचा वापर करण्यात आला आहे. या सुरंगाची उंची ६ फूट आणि रुंदी ८ फूट आहे, ज्यामुळे एकावेळी शेकडो श्रद्धाळू सहजतेने यातून प्रवेश करू शकतील. सुरंगाच्या भिंतींवर मंदिराच्या थीमशी सुसंगत अशी कोरीव सजावट करण्यात आली असून, ही यात्रा भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभूती ठरेल.
प्रोजेक्ट मॅनेजर काय म्हणाले?
या कामाचं संचालन करणाऱ्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विनोद मेहता यांनी सांगितलं की, परकोट्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिर पूर्णतः भक्तांसाठी खुलं झाल्यानंतर दररोज दीड लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. त्यामुळे गर्दीचं नियोजन आणि भक्तांना सुविधा मिळावी यासाठी ही सुरंग गेमचेंजर ठरणार आहे.
गर्दीपासून मिळणार मुक्तता
सिंहद्वाराजवळ तयार झालेली ही सुरंग भक्तांना थेट परिक्रमा मार्गात प्रवेश देईल. यामुळे मुख्य मंदिरात होणारी गर्दी कमी होईल आणि प्रत्येकाला अडथळ्याविना दर्शन व परिक्रमेचा लाभ घेता येईल.ही सुरंग केवळ एक दगडांची रचना नाही, तर ती श्रद्धा, भव्यता आणि तांत्रिक प्रगती यांचं संगमस्थळ आहे. श्रीरामाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा नवा मार्ग भक्तांच्या आस्थेला अधिक सखोल करणार आहे.