हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे अनेक लोकांची चिंता वाढत असून , बऱ्याच वस्तूंची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच काही बँकानी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक डिसेंबर महिन्यात होणार असून , त्या बैठकीत देशाच्या धोरणात्मक व्याजदराबाबत महत्वपूर्ण निर्णय होणार आहेत. या निर्णयामध्ये व्याजदर कमी करण्याची योजना आखण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित किरकोळ महागाई दर 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो मागील 14 महिन्यांतील सर्वाधिक आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या 2 ते 6 टक्क्यांच्या उद्दिष्टाबाहेर गेला असल्याने महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव बँकेवर वाढला आहे.
RBI चिंता वाढली
मागील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका आणि युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात घट केली त्यामुळे आर्थिक चैतन्य निर्माण झाले होते. पण भारतातील वाढती महागाई याचा विचार करता रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिमाण होईल , त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेऊ शकते .
महागाईचा फटका विविध क्षेत्रांवर –
अर्थव्यवस्थेमधील चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे हे प्राथमिक ध्येय आहे असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जेव्हा महागाई 6 टक्क्यांच्या वर जाते, तेव्हा रोख पैशाचा प्रवाह कमी करण्यासाठी व्याजदर वाढवणे हा उपाय आरबीआयकडून स्वीकारला जातो. यामुळे मागणी नियंत्रणात येऊन महागाई कमी करण्यास मदत होते. महागाईचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात विक्रीत घट झाली असून, एफएमसीजी कंपन्यांनाही मागणी कमी झाल्याने तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय शेअर बाजारातही सतत घसरण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
व्याजदरातील घट –
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढीचा निर्णय घेतल्यास बाजारात रोख पैसे कमी होऊ शकतात , तर व्याजदर घट केली गेल्यास बाजारातील मागणीला चालना मिळू शकते. सध्याच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँक आताचे व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या बैठकीत रिझर्व्ह बँक कोणता निर्णय घेईल , याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.