‘सखी माझे देहभान’ गाण्यासाठी सलमान अलीने दिला आवाज; प्रेक्षकांनी केला प्रेमाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले असून यानिमित्ताने गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. इंडियन आयडॉल सीजन १० चा विजेता सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे. सलमान अलीने पहिल्यांदाच गायलेलं हे मराठी गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.

Sakhi Maze Dehbhaan | Hee Anokhi Gaath | Mahesh M | Shreyas Talpade, Gauri I | Hitesh M | Salman Ali

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्याला संगीतही त्याच ताकदीचे लाभले आहे. या गाण्यात अनेक भावना दडल्या आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिच्या हावभावातून अनेक गोष्टी व्यक्त होतात. या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे चित्रपटाचा आत्मा असतो, त्यामुळे चित्रपटाच्या कथेइतकेच महत्व गाण्यांनाही आहे आणि ही जबाबदारी वैभव जोशी आणि हितेश मोडक यांनी लीलया पार पाडली आहे. संगीतप्रेमींना ही गाणेही आवडेल, यात शंका नाही’.

तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी या गाण्याविषयी बोलताना व्यक्त झाले. ते म्हणाले की, ‘या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. इतकंच काय तर ही दोन्ही गाणी अत्यंत वेगळ्या धाटणीची आहेत. या गाण्यात प्रेम, विरह अशा विविध भावना मिश्र स्वरूपात आपल्या भेटीस आल्या आहेत. त्यात या गाण्याला मोहक नृत्य अदाकारी लाभली आहे. त्यामुळे हे गाणे थेट आपल्या मनाला स्पर्श करणारे गाणे ठरत आहे. हे गाणे रसिक प्रेक्षकांचे आवडत आहे यापेक्षा वेगळा पुरावा काय असू शकतो.’