Satara Flamingo : साताऱ्यातील जलाशयात जमली फ्लेमिंगोसह इतर स्थलांतरित पक्षांची मांदियाळी सातारा जिल्हा म्हणजे निसर्गसंपन्नतेचा जणू खजिनाच… उंच डोंगरदऱ्या, येथील जलाशयामधील १२ ही महिने खळखळणारे पाणी केवळ पर्यटकांनाच नाही तर परदेशी पक्षांना सुद्धा खुणावते. खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षांसह इतर ५० प्रजातीचे स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तलावात (Satara Flamingo) अन्न पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत. पक्षीप्रेमींसाठी ही आनंदवार्ता आहे.
२०२३ मध्ये तर अगदी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये रोहित पक्ष्यांचे आगमन झाले होते. यावर्षी मात्र चांगला पाऊस झाल्याने तसेच खटाव तालुक्यातील विविध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाल्याने परदेशी (Satara Flamingo) पाहुण्यांच्या आगमनाला पोषक वातावरणनिर्मिती झाली आहे.पांढरे शुभ्र आणि त्यावर लालछटा असलेले पंख, लांब गुलाबी पाय असे हे शेकडो रोहित पक्षी, पट्टेरी राजहंस, पोचार्ड, पिंक टेल सह ५० पेक्षा जास्त पक्षी सध्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून सूर्याचीवाडी तलावावर दाखल झाले आहेत.
तसे पाहायला गेल्यास दरवर्षी फ्लेमिंगो पक्षी येरळवाडी तलाव परिसरात मुक्काम ठोकतात. मात्र यंदाच्या वर्षी येरळवाडी तलावात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या स्थलांतरित पक्षांकरिता काहीशी दलदली आणि कमी पाणी असलेली जागा पोषक असते. त्यामुळे यावर्षी (Satara Flamingo) या पक्षांनी येरळवाडी तलाव ऐवजी सूर्याचीवाडी तलावाला पसंती दिली आहे.
येरळवाडी, सूर्याचीवाडी हे परदेशी पक्षांच्या विविध प्रजातींचे पक्षी आणि पक्षीप्रेमींसाठी महत्त्वाचे स्थळ ठरत आहेत. या भागातील जैवविविधता संरक्षित असल्याचे हे द्योतक आहे. सध्या या भागात १०० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती पहायला (Satara Flamingo) मिळत आहेत. ‘ई बर्ड’वर तशी नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीणकुमार चव्हाण यांनी एका माध्यमाला दिली आहे.