पुण्यात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री वारजे भागात थरारक घटना घडली. शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या कारवर अज्ञात दोघांनी थेट गोळीबार केल्याने शहर पुन्हा हादरले आहे. ही घटना गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री सुमारे ११.४५ वाजता घडली.
धमकीपासून थेट गोळीबारापर्यंत धक्कादायक घडामोडी
यापूर्वीच घारे यांना वारजेतील एका सराईत गुन्हेगाराकडून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते. त्या फोननंतर काही तासातच हा थरार घडतो. घारे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात थांबले असताना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या काळ्या रंगाच्या Hyundai Creta कारवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या आणि तात्काळ पसार झाले.
स्थानिक नागरिकांच्या डोळ्यादेखत घडला थरार
घटनेच्या वेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी हा थरार पाहिला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच गोंधळ उडाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात निलेश घारे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
पूर्वसूचना असूनही काय घडलं?
विशेष बाब म्हणजे या घटनेच्या काही वेळ आधी म्हणजे रात्री सुमारे १० वाजता पोलिसांना संभाव्य धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. तरीही प्रत्यक्षात गोळीबार घडल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुण्यात गुन्हेगारी बिनधास्त?
या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांवर अशा प्रकारचा हल्ला खुलेआम होणं म्हणजे गुन्हेगार अधिकच बेधडक झाले आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून, दुचाकीस्वार आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय वैर, आर्थिक वाद किंवा इतर कोणता हेतू होता का, हे स्पष्ट होणे बाकी आहे. ही घटना केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर संपूर्ण पुण्यासाठी गंभीर इशारा आहे. गुन्हेगारीवर कडक कारवाई आणि नेत्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.