Shivangi Singh Pilot : भारताची महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? Video व्हायरल, पण सत्य काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shivangi Singh Pilot: भारत-पाकिस्तान सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून विविध अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत, ज्यामध्ये भारताचे फायटर जेट क्रॅश झाले, भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या (Shivangi Singh Pilot) ताब्यात आहे, तसेच भारताचा एस-400 डिफेन्स सिस्टम पाकिस्तानने उद्ध्वस्त केला असल्याचे दावे करण्यात आले. मात्र भारत सरकारच्या अधिकृत PIB Fact Check यंत्रणेने हे तिन्ही दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

पहिला दावा

पहिला दावा होता की, पाकिस्तानने भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला केला आणि ती प्रणाली नष्ट केली. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या. परंतु PIB Fact Check ने स्पष्ट केले की, हा दावा पूर्णपणे खोटा असून एस-400 सिस्टिम सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही आणि यासंदर्भात कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

दुसरा दावा

दुसरा दावा होता की, भारतीय वायुसेनेचे काही फायटर जेट्स नुकतेच क्रॅश झाले आहेत. या अफवेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले. परंतु PIB ने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा कोणत्याही दुर्घटनेची नोंद नाही आणि ही माहिती तथ्यहीन आहे.

तिसरा दावा – शिवांगी सिंह सुरक्षित

तिसरा आणि सर्वाधिक संवेदनशील दावा असा करण्यात आला की, भारतीय महिला फायटर पायलट शिवांगी सिंह पाकिस्तानकडून पकडण्यात आल्या आहेत. हा दावा विशेषतः पाकिस्तानसमर्थक सोशल मीडिया खात्यांवरून पसरवण्यात आला होता. मात्र PIB Fact Check ने या दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले की, स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्याबाबत कोणतीही अनिष्ट घटना घडलेली नाही.



या तिन्ही दाव्यांवरून स्पष्ट होते की, पाकिस्तान आता फक्त सैनिकी पातळीवर नव्हे, तर माहितीच्या माध्यमातून देखील भारताविरोधात मानसिक युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्या बातम्यांच्या आधारे जनमत गोंधळवण्याचा हा प्रयत्न भारतीय यंत्रणांनी वेळेत हाणून पाडला आहे. PIB च्या या स्पष्टीकरणामुळे देशातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांकडे योग्य तथ्य तपासणीशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.