देशभरात उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. महाराष्ट्रात देखील कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरी निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत येतात. मात्र सोलापूर -तुळजापूर या महामार्गावरील वाहतुकीमुळे पायी जाणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाकडून १४ तारखेपासून पुढील ४ दिवस सोलापूर ते तुळजापूर मार्गावर वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग सुद्धा दिले आहेत.
कोणते आहेत पर्यायी मार्ग ?
सोलापूर तुळजापूर मार्ग सोमवार रात्रीपासून चार दिवस बंद राहणार असल्यामुळे सोलापूर ते तुळजापूर या मार्गाने जाणारी वाहतूक सोलापूर ते तांदुळवाडी खानापुर ते तुळजापूर अशी वळविण्यात आली आहे. याची वाहधारकांनी दखल घ्यावी असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.