‘मायलेक’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग; विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी खास आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मायलेक चित्रपटाला विशेष प्रेम मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विशेष मुलांसाठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन

चित्रपटाची कथा, अभिनय सगळ्यांचेच कौतुक होत आहे. गाणीही सध्या ट्रेण्डिंगमध्ये असून त्यावर ‘मायलेकीं’चे रिल्सही झळकत आहेत. चित्रपट पाहाताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवत आहेत. आई आणि मुलींना जवळ आणणारा हा ‘मायलेक’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, असे दिसतेय.

दरम्यान, सोनाली खरे आणि ‘सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड’ या संस्थेने या विशेष मुलांसाठी ‘मायलेक’च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पाल्य- पालकांनी, संस्थेतील शिक्षकांनी हा चित्रपट एन्जॉय केला. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते असून नितीन प्रकाश वैद्य ‘मायलेक’चे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट..

दरम्यान चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली खरे यांनी म्हटले की, ‘प्रत्येक आईला आपली मुले प्रिय असतात आणि प्रत्येक मुलाचे आपल्या आईवर प्रेम असते. आज इथे जमलेल्या पाल्य- पालकांना बघून खूप छान वाटले. त्यांनी हा चित्रपट आवडीने पाहिला, त्यावर प्रतिक्रिया दिल्या, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‘सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड’ या संस्थेचेही मी आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले’.