पुणेकर आणि वाहतूक कोंडी यांचे अतूट समीकरण आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी तर इतकी कोंडी होते की बस्स …! पुण्यातला प्रवास नको रे बाबा…! अशी अवस्था होते. अनेकदा पुणेकर मात्र वाहतूक कोंडी किंवा गर्दी असली तरी लवकर कसे पोहचू ? याच प्रयत्नात असतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनेकांचा प्रवास सुरु असतो. मात्र आता पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे.
… तर वाहन 6 महिने जप्त
वाहतुकीच्या नियमांबद्दल कडक पावले उचलत उलट दिशेने वाहन चालवणाऱ्या लोकांचे वाहन ६ महिने जप्त करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ट्रिपल सिट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि उलट दिशेने येणार्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक शाखेकडून मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात वाहतूक शाखेने सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस अंमलदार कार्यरत असतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बेशिस्त वाहनचालक, रस्त्यांची दुरावस्था, अरुंद रस्ते यामुळे शहरातील सर्वच भागात वाहतूक कोंडी दररोज होताना दिसते. शहरात भरधाव आणि वाहतूकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून दररोज एक ते दोघांना आपल्या प्राणास मुकावे लागते. त्यामध्ये अनेक जण गंभीर तर काही किरकोळ जखमी होत असतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले.
वाहतूक शाखेने 1 ते 16 ऑक्टोबर दरम्यान केलेली कारवाई
- उलट दिशेने जाणारे वाहनचालक – 21 हजार 285
- ट्रिपल सीट – 2 हजार 872
- ड्रंक अँड ड्राईव्ह – 570
- जप्त वाहने – 215
अवजड वाहनांना दिवसा बंदी
शहरात विविध ठिकाणी इमारतीचे बांधकाम, आणि विकास कामे सुरु असून त्यासाठी डंपर, कॉक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरु असते. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात, त्यामुळे वर्दळीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.