Svamitva Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 65 लाख मालमत्ताधारकांना स्वामित्व कार्ड वाटप केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण भागासाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी सांगितले की, देशातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 230 हून अधिक जिल्यांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त गावांतील मालमत्ताधारकांना स्वामित्व योजना अंतर्गत 65 लाखांहून अधिक मालमत्ता कार्ड वितरित करण्यात आली आहेत.
स्वामित्व योजना काय आहे? (Svamitva Scheme)
स्वामित्व योजना ही आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून गावांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गावांमधील घरमालकांना त्यांच्या मालमत्तेचे अधिकार प्रदान करण्यात येतात.स्वामित्व (गाव सर्वेक्षण आणि नकाशण) उपक्रम ग्रामीण भारताला बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या उपक्रमाद्वारे सरकारकडून मालमत्तेची सुस्पष्ट मालकी नोंदी दिल्या जात आहेत, ज्यामुळे जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद कमी झाले आहेत.
योजनेचे फायदे
- ग्रामीण सशक्तीकरणासाठी आणि शासनासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
- मालमत्ता मुद्रीकरण (Property Monetization) सुलभ करण्यासाठी मदत होते.
- स्वामित्व कार्डाद्वारे ग्रामीण भागातील लोकांना बँक कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.
- जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.
- मालमत्ता कर व मालमत्तेच्या अचूक मूल्यमापनासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे.
2 कोटी 25 लाख मालमत्ता कार्ड तयार
आतापर्यंत 3 लाख 17 हजारांहून अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, जे लक्ष्यित गावांच्या 92% भागावर आधारित आहे.
सुमारे 1 लाख 53 हजार गावांमध्ये 2 कोटी 25 लाख मालमत्ता कार्ड तयार करण्यात आले आहेत.
ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल
ही योजना 24 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. स्वामित्व योजनेच्या (Svamitva Scheme) माध्यमातून मालमत्ता मालकीचे सुस्पष्ट अधिकार मिळाल्याने ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास अधिक वेगाने होत आहे. यामुळे भारताच्या ग्रामीण सशक्तीकरण प्रवासात ही योजना एक मैलाचा दगड ठरली आहे.