नागपुरात उभारणार ताज हॉटेल; ताज ग्रुपची मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तत्काळ मान्यता

0
1
Taj hotel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपुरात ताज ग्रुपची एन्ट्री होणार असून, लवकरच नागपुरकरांना ताज हॉटेलचा अनुभव घेता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ताज ग्रुपने त्याला तत्काळ मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी ताज ग्रुपने एक मिनिटही घेतला नाही.

ताज ग्रुपची मोठी घोषणा

ताज ग्रुपकडून नागपुरात ताज हॉटेल उभारण्यासोबतच दुसऱ्या जिंजर हॉटेलची उभारणीही केली जाणार आहे. सध्या नागपुरात जिंजर हॉटेल कार्यरत असून, दुसऱ्या जिंजर हॉटेलची भर पडणार आहे. त्यामुळे नागपूरच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये मोठा बदल घडणार आहे.

मुंबईत सौंदर्यात भर टाकणार नवं ताज हॉटेल

ताज ग्रुप सध्या मुंबईतील वांद्रे परिसरात भव्य आणि अद्ययावत ताज हॉटेल उभारत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताज ग्रुपला नागपुरातही हॉटेल उभारण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं, “मुंबईच्या सुंदरतेत या नव्या हॉटेलमुळे अधिक भर पडेल. ताज ग्रुपने महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपलं प्रभावशाली अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण नागपूरमध्ये ताज हॉटेल उभारण्याची गरज होती. माझी इच्छा आहे की तुम्ही यासाठी आजच घोषणा करावी.”

मुख्यमंत्र्यांचे रतन टाटा यांच्याशी भावनिक जुने संदर्भ

फडणवीस म्हणाले, “रतन टाटा यांना हे हॉटेल त्यांच्या जीवनकाळात पूर्ण झालेलं पाहायला मिळालं असतं, तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता. आम्ही प्रकल्पातील अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पाठीशी आहोत. नागपूर आणि मुंबईसारख्या शहरांसाठी अशा प्रकल्पांची गरज आहे.”

ताज ग्रुपची जागतिक ओळख आणि वचनबद्धता

ताज ग्रुपने जगभरात आपली हॉस्पिटॅलिटीची ओळख निर्माण केली आहे. “त्यामुळे परदेशातही ताज हॉटेल्समध्ये थांबल्यावर भारतात असल्याचा अनुभव येतो,” असं फडणवीस यांनी नमूद केलं. ताज ग्रुपच्या या पावलांमुळे नागपूरच्या पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रात मोठी भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नागपूरसाठी हा प्रकल्प म्हणजे केवळ हॉटेल नव्हे, तर एक मोठं आकर्षण ठरणार आहे, आणि शहराच्या आर्थिक तसेच पर्यटन विकासाला गती देणार आहे.