स्वात:वरचा धाडसी प्रयोग ! 18 वर्ष सापांच्या चाव्याचा सामना करत तयार केली विषावरील लस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Team Fryday : कॅलिफोर्नियातील टीम फ्रिडे हे नाव आता सर्पतज्ज्ञ आणि विषावरील स्वअनुभवाने संशोधन करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. त्यांच्या हटके आणि धाडसी प्रयोगामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वळले आहे. गेली १८ वर्षे, फ्रिडे यांनी स्वतःला विषारी साप चावू दिले आणि विविध सर्पविषांचे इंजेक्शन स्वतःला देऊन प्रयोग केले आहेत. त्यांचा दावा आहे की, त्यांनी स्वतःच्या शरीरात अँटीबॉडीज (Team Fryday) तयार करून सर्पदंशावरील लस विकसित केली आहे.

वर्षाकाठी लाखो लोक सर्पदंशाचे बळी (Team Fryday)

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी सुमारे ५१ लाख लोकांना साप चावतात, आणि त्यापैकी ८१,००० ते १३८,००० लोकांचा मृत्यू होतो. याशिवाय, लाखो लोक अपंगत्व, अंशतः अंधत्व, किंवा दीर्घकालीन शारीरिक त्रासांनी ग्रस्त होतात. यातील बहुतांश बळी ग्रामीण भागातले असतात, जेथे त्वरित वैद्यकीय सेवा आणि अचूक अँटीव्हेनम उपलब्ध नसतो. ही स्थिती पाहता, फ्रिडे यांचा प्रयोग जागतिक आरोग्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरू शकतो, असा विश्वास काही तज्ज्ञ व्यक्त करतात.

विचित्र छंद, पण वैज्ञानिक दृष्टिकोन

टीम फ्रिडे यांना लहानपणापासूनच सरपटणारे आणि विषारी प्राणी यांच्याबद्दल आकर्षण होतं. विस्कॉन्सिनमध्ये राहात असताना, त्यांनी विंचू आणि कोळींचं विष काढण्याचा छंद जोपासला होता. कालांतराने हा छंद इतका प्रबळ झाला की त्यांनी डझनभर विषारी साप घरात ठेवले.

स्वतःवरच प्रयोग

या १८ वर्षांच्या काळात, त्यांनी स्वतःवर विविध सापांचे विष प्रयोग केले. कधी स्वतःला साप चावायला लावले, तर कधी विष इंजेक्शन स्वरूपात घेतलं. हे सर्व प्रयोग त्यांनी अत्यंत काटेकोरपणे नोंदवले, आणि विषानंतर शरीरात काय परिणाम होतो हे बारकाईने निरीक्षण केले.

त्यांचा दावा आहे की, या सातत्याने विषाच्या संपर्कामुळे त्याच्या शरीरात नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज तयार झाल्या, ज्या विषाला निष्क्रिय करतात. त्यामुळे त्यांनी अनेक सर्पदंशानंतरही गंभीर परिणाम न भोगता पुनर्प्राप्ती केली आहे.

पारंपरिक अँटीव्हेनमपेक्षा वेगळा मार्ग

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अँटीव्हेनम्स घोड्यासारख्या मोठ्या प्राण्यांमध्ये विष टोचून तयार केले जातात. त्यामुळे ते मानवी शरीराला कधी-कधी साइड इफेक्ट देतात. तसेच, एका अँटीव्हेनमचा उपयोग फक्त विशिष्ट प्रजातीसाठीच होतो. फ्रिडे यांच्या म्हणण्यानुसार, मानवी अँटीबॉडीजवर आधारित अँटीव्हेनम विकसित केल्यास तो अधिक सुरक्षित, प्रभावी आणि बहुउपयोगी ठरू शकतो.

शोधाची शक्यता आणि संशोधनासाठी दिशा

फ्रिडे यांच्या रक्तातून अँटीबॉडीज काढून त्यावर संशोधन केल्यास भविष्यात एक सार्वत्रिक अँटीव्हेनम (Universal Antivenom) तयार होण्याची शक्यता आहे. ही लस भविष्यात विषबाधेवर स्वस्त, सुरक्षित आणि व्यापक उपाय देऊ शकते.