हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांसाठी पेन्शन योजना तयार केली जात असून ती येत्या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या योजनेच्या अंतिम प्रक्रियेवर सध्या काम करत आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांपासून ते स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या योजनेत योगदानकर्त्यांना त्यांच्या पेन्शन खात्यात नियमित मासिक योगदानासोबतच अधिक रक्कम भरता येणार आहे.
पेन्शन सुरू करण्याचा कालावधी –
जर एखादा नागरिक दरमहा 3,000 रु जमा करत असेल आणि त्याच्याकडे 30,000 रु किंवा 50,000 रु अतिरिक्त रक्कम असेल, तर ती रक्कमदेखील एका वेळी जमा करता येईल. योजनेत पेन्शन सुरू करण्याचा कालावधी निवडण्याचाही पर्याय दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही नोकरीची अट असणार नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती स्वतःचे दुकान चालवत असेल किंवा इतर कोणतेही छोटेसे व्यवसाय करत असेल, तरी तो या योजनेचा लाभ घेऊ शकेल. सरकारचा उद्देश प्रत्येक नागरिकाला वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वय –
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कोणतीही व्यक्ती कधीही या योजनेत सामील होऊ शकते. सध्या कामगार मंत्रालयाकडून विविध तज्ज्ञ, संघटना आणि नागरिकांकडून यावर सल्लामसलत केली जात आहे . एक अंदाजानुसार, वर्ष 2036 पर्यंत देशातील वृद्धांची संख्या 22 कोटींपेक्षा अधिक होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.