हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबदल एक भाष्य केले होते. यामुळे महाराष्ट्रात वादाला सुरुवात झाली. यासाठीच अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. पण आता नव्या वादाला तोंड फुटले आहे , हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून त्यात तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये औरंगजेबाला बर्बर शासक म्हणून घोषित करा . तसेच औरंगजेबाची कबर उखडून अरबी समुद्रात फेकण्याचीही मागणी केल्याचे दिसून येत आहे.
हिंदू सेनेकडून तीन मागण्या –
विष्णू गुप्ता यांनी गृह मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात, त्यांनी तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या . यात गुप्ता यांनी लिहिले की, “औरंगजेब हा क्रूर, कट्टर आणि अत्याचारी शासक होता. त्यामुळे त्याला बर्बर शासक घोषित करावा. अन त्याने हिंदूंवर जिझिया कर लादला आणि अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. “तसेच “भारताच्या कोणत्याही भागात औरंगजेबाच्या नावाने असलेल्या रस्त्यांची नावे लगेच बदलावीत.” या दोन मागण्यांसोबतच तिसरी मागणी म्हणजे “औरंगजेबाची कबर खोदून त्यातील अवशेष जाळून अरब सागरात टाका “.
मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही –
“छावा” चित्रपटाद्वारे सुरू झालेला औरंगजेब वाद आता संपूर्ण देशभर गाजत आहे. विष्णू गुप्ता यांच्या मागण्यांचा कायदेशीर दृष्टिकोनातून काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अजून या पत्रावर मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच या मागण्यांना काही मुस्लिम नेत्यांकडून विरोध केला जात आहे. हा नवीन मुद्दा राजकीय फायद्यासाठी सुरु केल्याचाही आरोप होताना दिसत आहे.