उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना! 7 जणांचा मृत्यू तर 80 हून अधिकजण जखमी

0
1
Uttar Pradesh accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भगवान आदिनाथांच्या निर्वाण महोत्सवातील एका कार्यक्रमात भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 80 हून अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. बडौत येथील श्री दिगंबर जैन डिग्री कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या लाकडी पायऱ्यांचे व्यासपीठ कोसळल्याने या सर्वांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी निर्वाण महोत्सवातील एका आयोजित कार्यक्रमात घडला. यावेळी निर्वाण लाडू पर्वासाठी भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. याचवेळी मानस्तंभावर अभिषेकासाठी चढत असताना पायऱ्यांचे व्यासपीठ अचानक कोसळले. ज्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. तसेच, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, काही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मृतांच्या शवविच्छेदनावरून वाद निर्माण झाला. अनेक कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शवविच्छेदनाला विरोध दर्शवत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना घेराव घातला. यावेळी, कार्यक्रमात योग्य नियोजन आणि सोय करण्यात आली नसल्यामुळे अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत तातडीने बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले. तसेच, जखमींच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.

महत्वाचे म्हणजे, ही दुर्घटना बडौत शहरातील गांधी रोडवरील जैन डिग्री कॉलेजच्या मैदानावर घडली. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले होते. परंतु आता अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी योग्य नियोजन केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची टीका करण्यात येत आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.