प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण अलीगढमधून समोर आलेली एक घटना या म्हणीला नव्याने अर्थ देते. येथे एका सासूने आपल्या होणाऱ्या जावयावर प्रेम केलं, आणि दोघं थेट लग्नाआधीच फरार झाले. सध्या हे प्रकरण केवळ कुटुंबापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर पोलिसांपर्यंत पोहोचलं असून, दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सासूच प्रेमात गुंतली
मडराक परिसरात राहणारी अपना देवी आणि मछरिया गावचा तरुण राहुल कुमार यांच्यात काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. राहुलचं लग्न शिवानी नावाच्या मुलीशी ठरलं होतं. ती म्हणजे अपनादेवीची मुलगी! मात्र, हळूहळू ही ओळख अनैतिक वळण घेऊन एका प्रेमसंबंधात बदलली. राहुल आणि अपनादेवी दोघांनीही आपलं प्रेम लपवून ठेवलं होतं. मात्र, 6 एप्रिल रोजी राहुलने लग्नाच्या 10 दिवस आधी, म्हणजेच होणाऱ्या सासूसोबत पळ काढला आणि या घटनेनं संपूर्ण गावात खळबळ उडाली.
10 दिवसांनंतर आत्मसमर्पण
दोघांच्या बेपत्तापणानंतर दोन्ही कुटुंबीयांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने तीन वेगवेगळ्या पोलीस टीम्सना त्यांच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आलं. अखेर, 10 दिवसांनंतर राहुल आणि अपना देवी यांनी दादो पोलीस ठाण्यात सरेंडर केलं.पोलिसांनी तात्काळ राहुलला मडराक पोलीस ठाण्यात हलवलं, तर अपना देवीला वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. सध्या दोघांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
अपनादेवीचा ठाम पवित्रा
अपना देवीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणते, “मी राहुलवर प्रेम करते. त्याच्याशी लग्न झालं नाही तरी मी त्याच्यासोबतच राहीन. आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचं पूर्ण नियोजन केलं आहे.”
पोलिसांनी जेव्हा विचारलं की, तिचा पती जितेंद्र जिवंत असताना दुसरं लग्न कसं शक्य आहे, त्यावर अपनादेवीचा ठाम उत्तर होता, “माझं लग्न कायदेशीर झालं नाही तरी मी माझा निर्णय बदलणार नाही.”
“सासूवर वाईट नजर नव्हती” – राहुलचं स्पष्टीकरण
राहुलला जेव्हा विचारण्यात आलं की, त्याचं सासूवर प्रेम कसं निर्माण झालं, तेव्हा त्याने सांगितलं, “मी केवळ तिला मानसिक आधार दिला. तिचं कुटुंब तिला त्रास देत होतं, म्हणून मी मदत करत होतो. हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. आता ती तयार असेल, तर मी तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार आहे.”
कुटुंबीयांची अजूनही प्रतिक्रिया नाही
आज, 17 एप्रिल रोजी पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ना अपनादेवीच्या घरातून, ना राहुलच्या कुटुंबाकडून कोणीही पोलीस ठाण्यात आलेलं नाही. दोघांबाबत पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस वाट पाहत आहेत.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू आहे. सामाजिक व नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही सासू-जावई प्रेमकहाणी आता काय वळण घेते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




