Vaishnavi Hagwane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाला मोठे वळण; बाळ अखेर कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vaishnavi Hagwane Case : पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ कोठे आहे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दोन दिवसांच्या शोधानंतर अखेर हे बाळ तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात आलं असून, ही माहिती एक अज्ञात व्यक्तीच्या (Vaishnavi Hagwane Case) फोनमुळे समोर आली आहे.

अचानक आलेल्या कॉलमुळे बाळ मिळालं

वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी सांगितले की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बाळ आपल्याकडे असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी बाणेर हायवेवर जाऊन बाळ आपल्या ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीची ओळख अजूनही समजू शकलेली नाही. तो व्यक्ती कोण होता, त्याचा बाळाशी काय संबंध होता, हेही एक कोडं आहे.

“बाळ आमच्याकडे आलं, म्हणजे वैष्णवी परत आली”

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितलं, “बाळ आमच्याकडे आलं, म्हणजे वैष्णवीच आमच्याकडे परत आली. आम्ही तिच्या आठवणी म्हणून बाळाला वाढवणार आहोत.” तसेच, त्यांनी सांगितले की, या बाळासाठी कोणाचाही फोन थेट त्यांना आला नाही, तर त्यांच्या भावाला फोन आला होता.

राष्ट्रीय महिला आयोगाची हस्तक्षेपाची मागणी (Vaishnavi Hagwane Case)

या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहून सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन दिवसांच्या आत तपास अहवाल मागवण्यात आला असून, आज तो आयोगाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

“फक्त हकालपट्टी नाही, अटक झाली पाहिजे”

राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेंना राष्ट्रवादी काँग्रेसतून हकालपट्टी करण्यात आली असली तरी, वैष्णवीच्या वडिलांचा रोष कायम आहे. फक्त राजकीय कारवाई करून चालणार नाही, राजेंद्र हगवणेंना तातडीने अटक झाली पाहिजे,” अशी मागणी अनिल कस्पटे यांनी केली आहे. याशिवाय, त्यांनी हेही नमूद केलं की अजित पवार गटातील महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी वक्तव्य केलं असलं तरी, अजूनही कस्पटे कुटुंबाशी (Vaishnavi Hagwane Case) थेट संवाद साधलेला नाही.

संपूर्ण राज्याच्या नजरा या प्रकरणावर

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता बाळ तिच्या माहेरच्या ताब्यात आल्यामुळे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा प्रश्न तसाच पेटत राहणार, हे स्पष्ट आहे.