Viral Video : आईचं हृदय कसं असतं? त्या हृदयात काय असतं? फक्त आपलं मूल सुखरूप, सुरक्षित असावं, हेच एकमेव स्वप्न. माणूस असो वा प्राणी, आईपणाचं हे नातं सगळ्यांत पवित्र. आणि जेव्हा आईच्या डोळ्यांसमोर तिचं कोवळं बाळ प्राण सोडतं… तेव्हा तीच काय होतं हे शब्दांत मांडणं अशक्य आहे. अशीच मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच मलेशियामध्ये (Viral Video) घडली, जिथे एका हत्तीणीने आपल्या बाळाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिला… आणि नंतर रात्रभर त्या मृत बाळाजवळ, ट्रकला डोकं टेकून ती रडत राहिली.
कोवळं हत्तीचं पिल्लू आणि हताश आई
ही हृदयद्रावक घटना मदर्स डेच्या दिवशी घडली. @ajpyro नावाच्या इंस्टाग्राम युजरने हे दृश्य व्हिडिओच्या (Viral Video) माध्यमातून जगासमोर आणलं. रात्रीच्या अंधारात, रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा आहे आणि त्याच्या खाली एक छोटं, निष्प्राण हत्तीचं पिल्लू पडलं आहे. त्याच्या थोड्याच अंतरावर त्याची आई – एक मोठी हत्तीण, शांतपणे उभी आहे. पण तिच्या त्या शांततेतही एक वेदना दडलेली आहे – एक आक्रोश, जो डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमधून व्यक्त होतो आहे.
आई म्हणून ती काहीही करू शकत नव्हती. तिचं बाळ तिच्यासमोर मृत होतं… आणि ती फक्त बघत राहिली. शेवटी ती त्या ट्रकच्या पुढच्या भागाला डोकं टेकवून उभी राहिली. घटनेमुळे या मार्गावर बराच काळ ट्राफिक जॅम झाले होते.
या घटनेने केवळ एक हत्तीण नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला आरसा दाखवला आहे. आपण माणसं विकासाच्या नावाखाली जंगलं तोडतो, रस्ते बांधतो, आणि मग हे प्राणी आपल्या जगण्यात अडथळा वाटायला लागतात. पण त्यांच्या जगण्याच्या हक्कालाही तितकंच महत्त्व आहे. त्या निष्पाप पिल्लाचं आयुष्य कदाचित वाचू शकलं असतं, जर ट्रक सावधपणे चालवला गेला असता.
सोशल मीडियावर भावनांचा पूर
या पोस्टखाली हजारो लोकांनी आपल्या भावना मांडल्या. एकाने लिहिलं आहे की, “आई ही आईच असते, मग ती कुणाचीही का असेना.” तर दुसऱ्याने नमूद केलं आहे की “हे पाहून डोळ्यांत अश्रू आले. आपण माणसं त्यांचं घरं हिरावून घेतो, आणि नंतर त्यांना गुन्हेगार ठरवतो.”
हत्तीणीच्या वेदनांनी संपूर्ण इंटरनेट भावूक झालं आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र हत्तीण काही केल्या तिथून हालली नाही. ती शांतपणे तिथे उभी राहून आपल्या बाळाला शेवटचं निरोप देत होती, जणू काही शेवटच्या काळजीने त्याच्या शवाजवळ ताटकळली होती.




