गरमागरम वडापाव , भजीचा स्टॉल पहिला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आधी आपल्याला रस्त्यांवर काही मोजकेच खाद्यपदार्थ दिसायचे मात्र सध्या अगदी बिर्याणीपासून ते पिझ्झा पर्यंत सर्वकाही रस्त्यांवरच्या हातगाड्यांवर चाखायला मिळतं. मात्र बऱ्याचदा रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्याबद्दल तिथल्या स्वच्छतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. एवढेच नाही तर सोशलमिडीयावर सुद्धा याबाबत व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता स्ट्रीट फूड विक्रेत्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती…
गरमागरम स्ट्रीट फूड विकायचं असेल तर त्यासाठी विक्रेत्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. 50 मार्क्सची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं तसे आदेश काढले आहेत. अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र भविष्यात ती बंधनकारक होऊ शकते. हजारो लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात त्यातून आपलं कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे विक्रेत्यांनी देखील स्वागत केलं आहे. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक जण अशिक्षित आहेत त्यामुळे परीक्षा ऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करावी अशी मागणी विक्रेत्यांमधून होत आहे.