राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना आता बेमोसमी पावसाने संकट निर्माण केले आहे. हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे शेती आणि मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर मासेमारीसाठी धोक्याचा इशारा
40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार
कोकणात 2500 हून अधिक मासेमारी बोटी किनाऱ्यावर
बाजारपेठेत माशांच्या किमतींमध्ये मोठी वाढ
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे खोल समुद्रात मासेमारी धोकादायक ठरणार आहे.परिणामी मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर आणल्या असून, मासेमारीवर अवलंबून असलेले छोटे व्यवसायही ठप्प झाले आहेत. बाजारात सुरमई माशाची किंमत 900 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
मिरची उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान
गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी रात्री दीड तास पडलेल्या पावसाने तोडणी केलेली मिरची भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात मिरची उन्हात वाळवली जाते, मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान बदलाचा महाराष्ट्रावर परिणाम
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामान बदल होत आहे.
दिवस भर उन्हाचा त्रास आणि संध्याकाळी गार वारे वाहत आहेत.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा – महाराष्ट्रालाही फटका बसणार.
राज्यातील हवामान अचानक बदलत असून, शेती आणि मासेमारी व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.पुढील काही दिवस वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.