सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? शिंदेंच्या आदेशानं नवी आशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिडकोच्या “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” या मोठ्या गृहनिर्माण योजनेतून तब्बल 26 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती, ज्यात सुमारे 21 हजार विजेते ठरले. पण स्वप्नवत घराच्या शोधात लॉटरी जिंकलेल्यांना मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा या घरांचे दर जाहीर झाले. अपेक्षेपेक्षा तब्बल 30-35% अधिक दर पाहून अनेकांनी नाईलाजाने घरे घेण्याचा निर्णय मागे घेतला.

गरिबांसाठीची योजना म्हणून जाहीर झालेली ही योजना प्रत्यक्षात उच्चभ्रू दरांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली. संतप्त विजेत्यांनी नवी मुंबईत मनसेच्या पाठबळाने साखळी आंदोलन, इंजेक्शन मोर्चा यांसारख्या आंदोलनांचा मार्ग अवलंबला. प्रशासनाला निवेदनं दिली गेली, पण सिडकोनं दर कमी करणे शक्य नसल्याचं ठामपणे सांगितलं.

…आणि मग एकनाथ शिंदेंनी घेतली ‘एन्ट्री’

या वाढीव किमतींच्या विरोधात लढा उभारलेल्या लॉटरी विजेत्यांच्या 32 सदस्यीय कोअर कमिटीने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी सिडकोच्या घरांच्या दरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी थेट शिंदेंसमोर मांडल्या आणि कन्फर्मेशन अमाऊंटची सक्तीही मागे घेण्याची मागणी केली.

शिंदेंनी याची गंभीर दखल घेत, तात्काळ सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन करून पुढील प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले. शिवाय दरवाढीचा पुनर्विचार करून लोकांना परवडेल असा निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. काही सोडतधारकांनी सिंघल यांची भेट घेऊन थेट संवाद साधावा, अशी सूचना शिंदेंनी केली आहे.

विजेत्यांमध्ये पुन्हा एक आशेचा किरण

या हस्तक्षेपानंतर सिडको लॉटरी विजेत्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झालं असून, “कदाचित आता घराचं स्वप्न खरं होईल” अशी भावना व्यक्त केली जात आहे. घरांच्या किमती कमी करून सामान्य माणसाच्या आवाक्यात आणल्या जातील का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.