प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस : खासदार इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मते आपल्याकडे वळविली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष संपल्यात जमा आहेत. अशावेळी एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत? हे कळायला मार्ग नाही. बहुदा एमआयएमला सोबत घेऊ नका अशी आरएसएसची फुस असावी , असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.

युतीतून बाहेर पडल्यानंतर वंचित आघाडीकडून जलील यांच्यावर टीकाही झाली. जलील यांनी ओवैसी यांच्याशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप आघाडीतर्फे करण्यात येत आहे. दुसरीकडे वंचित सोबत युती तोडल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी मौन बाळगले असल्याने जलील एकाकी पडले. यावर जलील यांनी स्वतः सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे .

विधानसभा निवडणुकीत एमआयमने आपल्या जागांची यादी द्यावी हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितले तेव्हा आम्ही त्यांना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी तो कमी करून पाठवण्यास सांगितले तेव्हा, तो ७४ जागांवर आणला. पंरतु त्यानंतर त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. ओवेसी आंबेडकरांच्या बैठकीत देखील त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ओवेसींच्या सभांचे नियोजन करता यावे यासाठी ज्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्हाला सांगा अशी आमची मागणी होती. पण आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही, ओवेसी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे असे सांगत वंचितच्या प्रवक्त्यांनी पत्रके काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.

Leave a Comment