बीड प्रतिनिधी । मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या संवेदनशील अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निकालानंतर कायदा व सुव्यस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीड पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
ते म्हणले कि बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९९२ मध्ये बीड, केज, पाथरुड, माजलगाव, परळीमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. या ठिकाणी सक्रिय असणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. या प्रसंगी ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, अशा आरोपी विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय धार्मिक वाद व तेढ वाढविण्याचा इतिहास असणाऱ्यांविरोधातही पोलिस करवाई करणार आहेत. जिल्ह्यात या दरम्यान शांतता प्रस्थापित रहावी यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी बैठक घेण्यात येत आहे. या दरम्यान समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याने जातीय तेढ वाढेल असे मेसेज व्हायरल करणाऱ्या विरोधात कडक करवाई करण्यात येईल असेही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोशल मीडिया सेल २४ तास कार्यरत राहून व्हाट्सअप, ट्विट्टर, फेसबुक यावर नजर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.