अहमदनगर प्रतिनिधी | देशातील महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांत सतत वाढ होत आहे. त्यांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थनही केले.
व्हेटरनरी डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. ही घटना हैदराबाद येथे घडली. याबाबत प्रसारमाध्यमांकडे अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिस चकमकीत आरोपी ठार झाल्यावर समाधान व्यक्त होत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.
आपल्या देशाची घटना सर्वोत्तम असल्याचे सांगत अण्णा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकष विचार करून घटना तयार केली आहे. हैदराबाद गुन्हातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जात होते. जर ते यशस्वी झाले असते तर त्यांच्याकडून पुन्हा असाच गुन्हा घडण्याची शक्यता होती.
जर असे झाले असते तर त्याला जबादार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मिळत नसेल तर अशा पोलिस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल,’ असेही हजारे म्हणाले. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नसल्याचे ते म्हणाले.