हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे यावर्षीची IPL स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आली आहे. IPL च्या या १३व्या हंगामासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशशिर उस्मानी यांनी व्यक्त केले.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केंद्र शासनाकडून ‘आयपीएल’च्या आयोजनाची परवानगी अद्याप मिळालेली नाही; परंतु आम्ही आमच्या परीने ‘आयपीएल’ आयोजनाच्या तयारीला प्रारंभ केला आहे. अमिराती शासनाकडे आम्ही स्पर्धेच्या आयोजनाचा अहवाल सुपूर्द केला आहे,’’ असे उस्मानी म्हणाले.
‘‘निश्चितच ‘आयपीएल’ ही एक व्यावसायिक स्पर्धा असल्याने या स्पर्धेसाठी येथील प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी अमिराती क्रिकेट मंडळ प्रयत्नशील आहे. स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा द्यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केला आहे. याबाबत त्यांच्याकडून लवकरच उत्तर येईल, अशी आशा आहे,’’ असेही उस्मानी यांनी सांगितले.
२ ऑगस्ट रोजी ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीची बैठक रंगणार असून यामध्येच स्पर्धेशी निगडित अनेक निर्णय घेण्यात येण्याचे अपेक्षित आहे. ‘आयपीएल’च्या ३-४ आठवडय़ांपूर्वीच सर्व संघांतील खेळाडू अमिरातीत दाखल होणार आहेत. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा २०१४ नंतर पुन्हा अमिरातीत ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येणार आहे.
‘‘गतवर्षी आम्ही १४ संघांचा समावेश असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरींचे आयोजन यशस्वीपणे करून दाखवले होते. त्यामुळे यंदा ‘आयपीएल’च्या आयोजनातसुद्धा आम्ही १०० टक्के योगदान देऊ. त्याशिवाय या स्पर्धेच्या आयोजनामुळे अमिरातीला क्रिकेट मंडळाच्या अर्थचक्राला अधिक चालना मिळणार आहे,’’ असेही उस्मानी म्हणाले.