रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ ओएनजीसी गॅस प्लँट आहे. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्लँटमध्ये आगीचा भडका उडला. लिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, या आगीत तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) आणि ओएनजीसीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून प्रयत्न केले जात असून, ओएनजीसी, जेएनपीटीबरोबरच द्रोणागिरी, पनवेल, नेरूळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान पाऊस सुरू असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे येत आहे. दरम्यान, प्लँटमध्ये काही कामगार अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्लँटमधून धूराचे लोळ बाहेर पडत असून परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.