कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : बोगस डॉक्टर हा गंभीर विषय आहे. 1994 ला त्या संदर्भात कायदा झाला. प्रभावी अंमलबजावणी होते की नाही यासाठी आढावा घेणे महत्वाचे आहे. पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीसाठी आणि जनजागृतीसाठी जिल्हा विधी व प्राधिकरण, पोलीस, वैद्यकीय विभाग आणि सामाजिक संस्था यांची कार्यशाळा वारंवार व्हाव्यात, अशी अपेक्षा जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी आज व्यक्त केली.
पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत समुचित प्राधिकाऱ्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये पीसीपीएनडीटी कायदा व त्यातील सुधारणा या विषयावर न्यायाधीश श्री. देशपांडे बोलत होते. सामाजिक आणि कायदेशीर पार्श्वभुमी समजून कार्यवाही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बाजारात येणाऱ्या प्रत्येक मशिनचे फायदे समजावून देणं, समाज मनावर ते बिंबवनं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे सकारात्मक फायदे सांगितले पाहिजेत. वारंवार संवाद होण्यासाठी शंकांचे निरसन होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत, असेही न्यायाधीश श्री. देशपांडे म्हणाले.
आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे यांनीही यावेळी संवेदशील राहून आपण जबाबदारीने कायद्याची अंमलबजावणी करायला हवी, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनीही स्त्रीभ्रूण हत्याबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सांगितला. पीसीपीएनडीटीच्या कायदे सल्लागार वकील गौरी पाटील यांनी सर्वांचे स्वागत प्रस्ताविक केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी केम्पीपाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांचे अधिकारी उपस्थित होते.