औरंगाबाद प्रतिनिधी | शिक्षक दिवस आणि महालक्ष्मी आगमनाचं औचित्य साधत एका कृषीसेविकेनं औरंगाबाद इथं महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे दिले. कृषीसेविका अनिता बनकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला.
सध्या जिल्ह्यात मका, तूर तसंच सोयाबीन यासारख्या मुख्य जिरायती पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होतो आहे. ही गोष्ट लक्षात घेत खुलताबाद तालुक्यातल्या शुहजातपूर येथील कृषीसेविका अनिता बनकर यांनी आपल्या मंडळातल्या गावात जाऊन थेट शेतकरी महिलांनाच शेती शाळेच्या माध्यमातून सेंद्रीय तंत्रातून पिकाचं किडनिवारण कसं करायचं याचे धडे दिले.
यांतून शेतकरी महिलांना कमीत कमी खर्चात कीडरोग नियोजन करणं सोपं जात आहे . आज शिक्षकदिनाचं आणि महालक्ष्मी आगमनाचं निमीत्त साधत बनकर यांनी शेतकरी महिलांना शिक्षीत करण्याचं काम केलं. याबाबत कृषी विभागाकडून बनकर यांच्या कामाचं कौतूक होतं आहे.