राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराने केला भाजपात प्रवेश, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. ही गळती थांबावी म्हणून डॅमेज कंट्रोल साठी खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन जी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातीलच एक उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनीच राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.

केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असून आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा परळी येथे प्रवेश सोहळा निश्चित झाला आहे. राज्याच्या माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय विमल मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर पक्षाने दोन वेळा मंत्रिपदाची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा आणि सुनबाई यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्याशी गेल्या साडेचार वर्षात अक्षय आणि नमिता यांचे पटत नाही. तरीदेखील लोकसभा निवडणुकीत अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम चोखपणे केले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून विरोध होत असल्यामुळे ते देखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथे जाहीर मेळाव्यात नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळुंके आणि धनंजय मुंडे या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.

अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अक्षय आणि नमिता हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार नाहीत, असा अंदाज शरद पवारांना होता. मात्र पवारांना खोटे ठरवत अक्षय आणि नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील यशश्री या निवासस्थानी आज त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. त्याचबरोबर त्यांना केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील भाजप कडून जाहीर केली जाणार असून त्यामुळे विद्यमान आमदार संगीता ठोंबरे समर्थक मात्र नाराज झाले आहेत..

Leave a Comment