रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रांचीच्या एका वकिलाने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. 2013 -14 च्या प्रचारात आणि भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने न पाळल्याने त्याने हा खटला दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मंत्री रामदास आठवले यांच्यावर निवडणुकीच्या रॅलीत खोटे बोलून सर्व सामान्य जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
वकील एच के सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, भाजपच्या नेत्यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते पण सामान्य जनतेची दिशाभूल करून बहुमत मिळाल्यावर त्यांनी यूटर्न घेतला.
सिंग म्हणाले की, मी देखील भाजपच्या या खोट्या प्रचाराचा बळी ठरलो. देशातील सामान्य जनतेची भाजपच्या नेत्यांनी मोठी फसवणूक केली आहे.
सिंग यांच्या तक्रारीवर न्यायालयाने कलम 415, 420 आणि 123ब अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पुढील सुनावणी 1 फेब्रुवारीला होणार आहे.