नाशिक प्रतिनिधी | भारतात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचे राज्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध स्तरावर खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणारा चैत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस, आरोग्य, इत्यादी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाने कर्मचारी व ग्रामस्थांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून मास्क व जंतूनाशक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत.
तुळजाभवानी देवीचे दर्शन मंगळवारपासून बंद !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर १७ मार्च रोजीपासून भाविकांना दर्शनासाठी बेमुदत काळासाठी बंद करण्यात येत आहे. शिवाय, काही दिवसांवर येऊन ठेपलेली चैत्री पौर्णिमा यात्राही रद्द केल्याची माहिती व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे व विश्वस्त नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सोमवारी पुजारी मंडळाच्या बैठकीत दिली.