कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : महाराष्ट्र सेवा हमी कायद्यांतर्गत महापालिकेत नवीन ऑनलाइन परवाना यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन परवाना काढता येणार असून या संधीचा लाभ व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. परवाना नोंदणी तपासण्यासाठी पथक नियुक्त केले जाणार असून परवाना न काढणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. तसेच एक एप्रिलपूर्वी कोल्हापूर शहर नागरिकांच्या सहकार्याने प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
परवाना काढण्यासाठी यापूर्वी व्यावसायिकांना परवाना फॉर्म घेवून नोंदणी करण्यासाठी आणि परवाना फी भरण्यासाठी नागरिकांना सुविधा केंद्रावर यावे लागत होते. पण आता ऑनलाइन पद्धतीमध्ये व्यवसायधारक महापालिकेच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करु शकतात. व्यावसायिकांना स्वत:चा युजर आयडी तयार करावा लागणार असून त्यावर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरी सुविधा केंद्र आणि ऑनलाइनवर रक्कम भरता येणार आहे. रक्कम भरल्यानंतर ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार आहे.
सध्या परवानाधारकांची संख्या १२ हजार असून त्यांचीही नोंदणी ऑनलाइनवर होणार आहे. तसेच नवीन व्यावसायिकांनाही नोंदणी करता येणार आहे. शहरातील १०९ प्रकारच्या व्यवसायांना परवाना लागू होत असून त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. ऑनलाइनवर नोंदणीचा प्रसार करण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह अन्य व्यवसायांच्या संघटनांशी संपर्क साधून परवाना कसा काढायचा याचे प्रात्यक्षिकही सादर केले जाणार आहे. शहरात अनेक व्यावसायिकांनी परवाने काढले नसून त्यांची तपासणी करण्यासाठी एक पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. परवाना काढण्यासाठी मिळकत पत्र किंवा सातबारा उतारा, भाडेकरार, नऊ अटींचे हमीपत्र, गुमास्ता प्रमाणपत्र, घरफाळा पावती, बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र, जुनी इमारत असल्यास असेसमेंट उतरा, व्यवसाय सुरू असलेल्या इमारतीचे फोटो जोडावे लागणार आहेत.