सकलेन मुलाणी । कराड
कराड:-कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील अनेक मोठया गांवामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या वाढली आहे.परंतू तसे पाहिले तर या गांवातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही 80 टक्के व त्याहून जास्त आहे.तरीही कोरोना रुग्ण सापडणाऱ्या गांवामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत जनजागृती करण्याच्या सुचना महसूल,ग्रामविकास विभागांना दिल्या आहेत.तसेच गर्दी टाळण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणांना दिल्या असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज कराडमध्ये सांगितले.कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता गर्दी टाळणे,अनावश्यक घराबाहेर पडणे, सातत्याने मास्कचा वापर करणे हे जे उपाय जनतेच्या हातात आहेत ते जनतेने काटेकोरपणे करावेत असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी जनतेला यावेळी केले आहे.
आज कराड येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षते खाली कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलमधील कोरोना रुग्णांचा आढावा घेणेकरीता तसेच कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजीत केली होती याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख,कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील,कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,कराड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती खैरमोडे व डॉ.धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक ते उपचार देणेकरीता,उपचाराकरीता बेड उपलब्ध करुन देणेसंदर्भात तसेच लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोना संसर्ग फैलावू नये याकरीता पाटण येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सत्र सुरुच आहे. आमचे सुपने मंडल कराड तालुक्यात असले तरी या विभागातील जनतेची तसेच सापडलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.त्यानुसार कराड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या यापुर्वी चार ते पाच वेळा बैठका घेवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.अजुनही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या उपाययोजना तातडीने कराड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी कराव्यात.आता लॉकडाऊन उठल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे.कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याचे काम आता जनतेचे आहे.जनतेनेच आता स्वयंस्फुर्तीने कोरोनाचा सामना करावयाचा आहे. याकरीता जनतेमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले पाहिजे,गर्दी होण्याचा धोका आहे त्याठिकाणी जाणे टाळले पाहिजे,अनावश्यक घराबाहेर येणे टाळले पाहिजे या ज्या गोष्टी जनतेच्या हातात आहेत त्या त्यांनी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये याकरीता जनजागृतीची गरज असून ही जनजागृती करण्याकरीता गांवामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांना प्रशासनाने सुचना कराव्यात अशाही सुचना बैठकीत दिल्या असल्याचे सांगत त्यांनी कराडमध्ये ऑक्सीजनचे बेड आहेत त्याचे नियंत्रण प्रातांधिकारी यांनी करावे बहूतांशी पाटण तालुक्यामधून येणारे कोरोना रुग्ण आहेत त्यांना कराडमधील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नाहीत तसे पाहिले तर सगळयाच रुग्णालयात कोरोना रुग्णांची गर्दी झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण या रुग्णालयात आहेत तरीसुध्दा पाटण तालुक्यातील अतिशय अत्यव्यस्त रुग्णांना कराड येथील रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी यांना बैठकीत दिले. व सगळयांची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी बैठकीत केले.
साताऱ्याचे जम्बो कोरोना सेंटर लवकर सुरु होणेकरीता प्रयत्नशील- ना.शंभूराज देसाई
सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आमचे विनंतीवरुन राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी साताऱ्याला तातडीने कोरोनाचे जंम्बो सेटंर सुरु करण्यास मंजुरी दिली. साताराचे जम्बो हॉस्पीटल लवकरात लवकर सुरु करण्याचा माझा व्यक्तीश: तसेच जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचा प्रयत्न सुरु आहे. तसे आमचे नियोजन सुरु आहे.बेडवाचून उपचार मिळत नाहीत असे होवू नये याकरीता आम्ही प्रयत्नशील असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता निधी कमी पडू देणार नाही असे मुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.