छात्रभारती, राष्ट्र सेवा दलाच्या लाँगमार्चच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ एस.टी. प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेत आहेत त्यांनाही मोफत एस.टी. पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सवलती दिल्या जाव्यात या छात्र भारतीच्या महत्वाच्या मागण्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या.

शिक्षण – रोजगाराच्या हक्कासाठी छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढला होता. हजारो तरुण मुंबईत दाखल झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात भेट घडवून आणली. मुख्यमंत्री मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले.
शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, संदीप आखाडे, राकेश पवार, लोकेश लाटे, कीर्ती इटकर आणि सचिन बनसोडे यांचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात या मागणीविषयी चौकशी करुन कार्यवाही करण्याचं मान्य केलं. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर करावा या मागणीवर सकारात्मक कृतीचे आश्वासन दिले आहे. दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क रद्द करुन त्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्व परीक्षांसाठी येण्याचा जाण्याचा प्रवास खर्च शासनाने द्यावा, या मागणीवरही विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपुर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी. स्थगित शिष्यवृत्या पूर्ववत सुरु कराव्यात. या मागणीवरही विचार करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यापासून १५ नोव्हेंबरला लाँगमार्चची सुरवात झाली होती. लाँगमार्चमधील हजारो तरुण पायी चालत मंत्रालयावर धडकणार होते. लाँगमार्च पाचव्या दिवशी मुंबईत आला आणि मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी ३.३० वा. (१९ नोव्हेंबर) विधान भवनात चर्चेसाठी बोलावलं होतं.

Leave a Comment