जया बच्चन चुकीचं असं काय बोलल्या? त्यांनी संपूर्ण देशाची भावनाच संसदेत मांडली- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. जया बच्चन काय चुकीचं बोलल्या? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राज्यसभेत मंगळवारी खासदार जया बच्चन यांनी नाव न घेता अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या होत्या. यावर कंगनाने जया बच्चन यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आहे.

जया बच्चन चुकीचं काय बोलल्या?, ड्रग्स कनेक्शनमध्ये केवळ महाराष्ट्राचंच नाव का घेतलं जात आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. जया बच्चन यांनी संपूर्ण देशाची भावनाच संसदेत मांडली आहे. आज संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री गप्प आहे. लोकांनी बोलूच नये असं वातावरण तयार करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं वातावरण आणिबाणीच्या काळात होतं. आताही लोक बोलण्यास धजावत नाही. पण आणिबाणीतही अनेक कलाकार रस्त्यावर आले होते. किशोर कुमार हे त्यापैकी एक होते, असं राऊत म्हणाले.

ड्रग्स तस्करी रोखणंही केंद्राचीही जबाबदारी आहे. ड्रग्सचे काळेधंदे रोखण्यासाठी राष्ट्रीय एजन्सी निर्माण करण्यात आलेली आहे. प्रत्येकवेळी केवळ महाराष्ट्राचं नाव घेतलं जात आहे. यूपी, बिहार आणि नेपाळहून ड्रग्स येतं, असं सांगतानाच ड्रग्सबाबत जे लोक बोलत आहेत. स्पोर्ट्समध्ये होते त्याप्रमाणे त्यांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, असंही राऊत यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाल्या होत्या राज्यसभेत जया बच्चन?
बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं खासदार जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.

याशिवाय या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या.

त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment