नवी दिल्ली । सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या बेछूट वक्तव्यांनी बॉलिवूडमधील अनेकांनवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरुन कंगनाने बॉलिवूडमधील अनेकांना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार धरत त्यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, राज्यसभेत मंगळवारी खासदार जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या. जया बच्चन यांची टीका कंगनाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांच्या टीकेला तिने आक्रमक उत्तर दिलं आहे.
कंगनानं बच्चन परिवारावर हल्ला करताना ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जया जी, तुम्ही तेव्हा पण असचं बोलता का? जेव्हा माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेलं असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हेच बोलला असता जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता, आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसता असता? आमच्याबद्दलही सहानुभुती दाखवा असं ती म्हणाली आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या राज्यसभेत जया बच्चन?
बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं खासदार जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.
याशिवाय या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या.
त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.