कोल्हापूर / प्रतिनिधी- जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात संपन्न झाला. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन हे उपस्थित होते. यावेळी 60 हजार 167 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
दीक्षांत समारंभास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मश्री शिवराम भोजे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू बी.पी. साबळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासात स्वयंशिस्त आणि सातत्य ठेवून उच्च ध्येय जोपासावे, असे आवाहन करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपण जे काम हाती घेता तसेच करता ते समर्पणाच्या भावनेतून प्रामाणिक हेतूने करावे. त्यासाठी इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जगासमोर आज जागतिक तापमानवाढीचे संकट उभे असून या संकटाला सामूहिक प्रयत्नातून रोखणे काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आज पर्यावरण संतुलन सर्वार्थाने महत्वाचे आहे. यासाठी स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्तीचा संकल्प सर्वांनी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरणाला प्राधान्य देवून आपला समाज आणि आपला परिसर स्वच्छ, सुंदर, आरोग्य संपन्न बनविण्यात योगदान द्यावे.
प्रत्येकाने जीवनात आईचा आदर करण्याबरोबरच भारतमातेचाही आदर करावा, असे आवाहन करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आई, मातृभाषा, पर्यावरण आणि भारतमाता या चार मातांना मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने या मातांचा आपल्या जीवनात आदर करणे महत्वाचे आहे. पर्यावरण जोपासून जागतिक तापमान वाढीचे संकट रोखण्या कामी विद्यार्थ्यांनी सक्रीय योगदान द्यावे. कोल्हापूर राज्यातील सर्वात स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त शहर बनवून कोल्हापूरकरांनी इतिहास बनवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गुरूकुल शिक्षण पध्दतीचा अवलंब व्हावा-प्रा. डॉ. भूषण पटवर्धन
देशातील शिक्षण पध्दतीमध्ये यापुढील काळात गुरूकुल शिक्षण पध्दतीचा अवलंब व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, सध्याच्या कुलगुरू शिक्षण पध्दतीत सुधारणा करुन गुरूकुल शिक्षण पध्दती अंगीकारणे गरजेचे आहे. गुरूकुल शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांची सुप्त क्षमता आणि व्यक्तीमत्व विकासाला निश्चितपणे प्रेरणा मिळेल. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शिक्षण पध्दती आणली असून त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयानी भर द्यावा. जेणेकरून महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारा ग्रामीण भारत निर्माण होईल.
विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी केंद्रीत व्हावे, असे आवाहन करून डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणात सहभागी करून घेवून त्यांच्या क्षमता जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या कलानुसार शिक्षण पध्दती अंगीकारावी. शिक्षकांनी शिक्षण ही आपली मक्तेदारी न समजता विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाचा ध्यास घ्यावा. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थी केंद्रीत नवी शिक्षण पध्दती आणली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांना आणि कलागुणांना वाव देण्याची भूमिका घेतली आहे. आयोगाकडून विद्यार्थ्यांसाठी नॅशनल ॲकॅडमी क्रेडीट बॅक हा उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
शिवाजी विद्यापीठाच्या जैवविविधता व सर्वसमावेशक उल्लेखनीय धोरणांचा तसेच विद्यापीठास मिळालेल्या ए मुल्यांकनाबाबत गौरव करून डॉ. पटवर्धन म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा 58 वर्षाचा वारसा भारतीय शिक्षण प्रणालीच्या परिवर्तनाच्या टप्प्यात महत्वाची भूमिका बजावली. भारतीय शैक्षणिक प्रणालीचा पुन:रूच्चार करण्याची गरज असून गौरवशाली भूतकाळाचे धडे आपणास उज्वल भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी स्वागत करून शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात यंदाच्या दीक्षांत समारंभात सर्वोच्च म्हणजे 60 हजार 167 पदवी प्रमाणपत्रांची संख्या आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे. त्यांनी यावेळी विद्यापीठाच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला.
प्रारंभी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांचे ग्रंथभेट विद्यापीठाचे सन्मानचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी पदवी, पदविका व प्रमाणपत्रांच्या यादीचे वाचन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व मान्यवरांचे पयासदानाच्या साथीने दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. समारंभास मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी – विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.