ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत संजयकाकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी| कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत आजपर्यंत खासदारांनी मौन पाळले होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.संजयकाका पाटील यांनी मतदार संघाची बदलती परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घातली असून उमेदवारीबाबत ते कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेणार असल्याचे वृत्त आहे.

ज्योतीताई पाटील यांची उमेदवारी ही विद्यमान आ.सुमनताई पाटील यांची चिंता वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार तासगावचा, आमदार तासगावचा अशी ‘कॅचलाईन’ वापरण्यात आली होती. यामुळे राष्ट्रवादीचा मोठा मतदार हा भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या मागे उभा राहिल्याचे आकडेवारी सांगते. विशाल पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून जबरदस्त पिछेहाट सहन करावी लागली.

आता कवठेमहांकाळ मधून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उमेदवारी आल्यामुळे राष्ट्रवादी समर्थक निवांत होते. तासगावमधून मोठे मताधिक्य व कवठेमहांकाळमधून गटाची मदत या भरवशावर आतापर्यंत त्याचा विचार झाला. मात्र आता तासगावमधून ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीचा विचार झाल्यास तासगावमधून मोठी मतविभागणी होणार असल्यामुळे सुमनताईंच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोशल मिडियातून खासदार समर्थकांनी ज्योतीताईंच्या उमेदवारीसाठी जोरदार आघाडी उघडली आहे.

Leave a Comment