मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी युतीतील अंतर्गत वादामुळे राज्यात नवीन सत्तासमिकरण पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तास्थापनेसाठी तीस-या पर्यायावर आता गांभीर्याने विचार सुरू असून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आज शरद पवार राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी कालच्या सोनिया भेटीनंतरच्या पत्रकारपरिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांना तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक आहात का का? असा प्रश्न विचारला त्यावर पवारांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातले मतभेद वाढलेच तर महाराष्ट्रात मोठी राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यताही त्य़ांनी व्यक्त केली. या पत्रकारपरिषदेला राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार उपस्थिती होते. पवारांच्या या भेटीत अजित पवारांची उपस्थिती ही लक्षवेधी मानली जात आहे.
राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं सत्तेचं समिकरण पढे येत असल्याचे पाहून राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी शरद पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तसा प्रस्तावदेखील त्यांनी मांडला होता. राज्यात पवार पुन्हा परत येतील अशीही चर्चा सुरू झाली होती. परंतु कालच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपण मुख्यमंत्री होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. मात्र, राज्यातील सत्तेची समिकरणं बदलू शकतात असं सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.