थायलंडमधील मंदिरात विराजमान होणार दगडूशेठ बाप्पांच्या मूर्तीची प्रतिकृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे म्हणजे लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान. दगडूशेठ गणपती हा पुणेकरांपुरता मर्यादित नाही. तर, परदेशवासीयांचा देखील लाडका बाप्पा आहे. परदेशातून येणा-या पाहुण्यांना देखील दगडूशेठच्या बाप्पाचे दर्शन घेण्याची एक खास ओढ नेहमीच असते. त्यामुळे अशा आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन परदेशातही नेहमी घडावे, यासाठी थेट थायलंडमधील मंदिरात हुबेहुब दगडूशेठच्या बाप्पांसारखी मूर्ती विराजमान होणार आहे.

थायलंडमधील काही नागरिकांच्या पुढाकाराने थायलंडमधील बँकॉक येथील लक्ष्मी-नारायण मंदिरामध्ये गणपतीचे मंदिर बांधून तेथे या हुबेहुब दगडूशेठ गणपती सारख्या असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. थायलंडच्या नागरिकांमध्ये दगडूशेठ बाप्पांविषयी विशेष प्रेम आहे. परंतु प्रत्येकालाच पुण्यामध्ये येऊन बाप्पांचे दर्शन घेता येत नाही. त्यांना त्यांच्याच शहरामध्ये बाप्पाचे दर्शन घेता यावे आणि बाप्पाची पूजा करता यावी अशी थायलंडवासियांची इच्छा होती. यासाठी या मूर्तीची तेथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

नुकतेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी थायलंड येथील धनंजय, उमेश, नीळकंठ, गंगा तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी हे उपस्थित होते. ही मूर्ती थायलंड येथे रवाना झाली आहे. ही मूर्ती साडे-चार फूटांची असून फायबरमध्ये बनविली आहे. तसेच दगडूशेठ गणपतीप्रमाणे याला विविध अलंकार देखील बनविले आहेत. निलेश पारसेकर यांनी ही मूर्ती बनविली आहे. तर मुखेडकर यांनी ही मूर्ती रंगवली आहे. नितीन करडे यांनी तांब्यावर सोन्याचा मुलामा देऊन मुकुट, परशू, कान, शुण्डाभूषण, गळ्यातील हार असे विविध दागिने बनविले आहेत.

Leave a Comment