आनंदोत्सव | जय गणेश संस्था
जय गणेश जलसंवर्धन अभियान
पुणेकरांनी पुणेकरांसाठी सुरू केलेली एक चळवळ म्हणजे ‘जन-सहभागातून पाणी’.
पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी-पुरवठा होतो. पुण्याला पाणी मिळण्याचे हे मुख्य उगमस्थान आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या पाण्यात गाळ साठल्यामुळे ह्या स्थानाची पाणी-साठवण-क्षमता कमी होत गेली आहे. या पाणी-साठ्यातून पुणेकरांना पिण्याचे पाणी मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजाही हे धरण भागवते. गेल्या काही वर्षांत यातही पाण्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर एकच पीक घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शहरवासियांनाही पाणी-कपातीला तोंड द्यावे लागत आहे.
कर्नल सुरेश पाटील या निवृत्त सैन्याधिकाऱ्याने निवृत्तीनंतर स्वत:ला समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राज्य सरकार आणि काही स्वेच्छा-संस्था यांच्या एकत्रित सहाय्य्याने त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे फारसे चांगले परिणाम दिसेनात. कर्नल पाटील यांच्या या प्रयत्नांबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती-ट्रस्ट्ला कळले आणि त्यांनी ह्या प्रश्नात लक्ष घातले. ट्रस्टने आता ’जलसंवर्धन अभियान’ सुरू केले आहे.
हे खूप प्रचंड काम आहे, त्यामुळे ट्रस्टने इतर अनेक गणेश-मंडळे आणि नागरिक-गटांना एकत्रित करण्याचे ठरवले. ट्रस्टच्या या हाकेला जवळजवळ ४०० गणेश-मंडळांनी प्रतिसाद दिला आणि मदतीचा हात पुढे केला. दहा जड खोदाई-यंत्रे आणि सोळा डंपर्सच्या सहाय्याने या पाणी-साठ्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. ह्या कामाची दैनंदिन पहाणी करण्याची जबाबदारी गणेश-मंडळांवर सोपवण्यात आली आहे. तीन ते चार गणेशमंडळांचे कार्यकर्ते रोज स्वत: जातीने हजर राहून या कामावर देखरेख करतात. सैन्यानेसुद्धा या कामाला हातभार लावला असून त्यांनी आपली काही खोदाई-यंत्रे दिली आहेत. नागरिक आणि सैन्य यांच्या सहकार्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे.
गाळ उपसण्याचे हे काम पूर्ण झाल्यावर तो परिसर स्वच्छ करून त्याचे सुशोभिकरण करण्याचे ट्रस्टने ठरवले आहे. नागरिकांना चालण्यासाठीचे हे एक निसर्गरम्य ठिकाण बनवण्याचा मानस आहे. इथे पक्ष्यांना आमंत्रित करतील अशी झाडे लावण्याची कल्पना आहे. या कामासाठी सरकारची परवानगीही ट्रस्टने मिळवली आहे. ’सरकारचे काम’ म्हणून साधारणपणे बोळवण केल्या जाणाऱ्या या प्रकारच्या कामात लोकांच्या व सार्वजनिक संस्थांच्या सहभागातून ही जबाबदारी उचलली जाण्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. भविष्यकाळात या कामाकडे एक आदर्श म्हणून पाहिले जाईल यात शंका नाही.
२०१७ साली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हे अभियान राबविण्यात आले होते. साधारण २० दिवस गरीब व गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचार देण्यात आले.