दसरा विशेष | दस-याला आपण आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर, नातेवाइकांबरोबर आपटयाच्या पानांची देवाणघेवाण करतो. याला ‘सोनं लुटणे’ असं म्हणतात. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, केवळ या एकाच दिवशी आपटयाची पानं एकमेकांना का देतात? आणि याला ‘सोनं लुटणे’ असं का म्हणतात? तर यामागे काही कथा आहेत. असं मानतात की, पूर्वी वीर मराठे शत्रूचा प्रदेश जिंकून सोन्या-नाण्याच्या रूपात संपत्ती घरी आणत असत. ती देवासमोर ठेवून त्याला नमस्कार करत असत आणि नंतर आपल्या आप्तजनांसह त्या सोन्याची देवाणघेवाण करून आनंद साजरा करत असत. हीच प्रथा आपण आपटयाची पानं एकमेकांना देऊन साजरी करतो. ‘दिल्याने आनंद वाढतो’ असं आपली संस्कृती शिकवते. त्यामुळे आपल्याकडे असलेलं ज्ञान, लक्ष्मी इतरांसोबत वाटल्याने एकमेकांमधला सलोखा वाढतो, आनंद वाढतो, हाच संदेश ही ‘सोनं लुटण्याची’ प्रथा देते.