सातारा प्रतिनिधी ।जीवनात कधी कोणत्या वेळी आणि कोणत्या गोष्टीला महत्व येईल हे सांगता येत नाही. राजेवाडी तलावाचेही काही असेच घडले. एरव्ही ढुंकूणही न पाहणारे शेजारी, गाववाले आणि परिसरातील लोक आज दुचाकी, चारचाकी घेवून कुटूंबासहीत पर्यटनास येवू लागलेत. त्यामुळ तलावाला पर्यटनाचे स्वरुप आले आहे.
2006 मध्ये झालेल्या पावसान हा तलाव भरला होता. त्यानंतर जेमतेम 2 ते 3 वर्ष या तलावामध्ये पाणी होत. त्यानंतर पावसान दडी मारल्याने तलाव कोरडा राहिला. तो तब्बल 12 वर्षांनी या पावसाळ्यात भरला. तलावाच्या सांडव्यावरुन पाणी खळखळ वाहू लागले आहे. तलाव कोरडा होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर त्यातून गाळ उपसा झाला. त्यामुळ यावेळी जास्त पाणीसाठा साठण्यास मदत झाली आहे. या पाणीसाठ्याचा फायदा सोलापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. सोलापूर, सांगली हद्दीत पाणी सोडले तर जेमतेम वर्षभरात पाणीसाठा संपुष्ठात येतो, असे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. या तलावाच्या क्षेत्रात देवापूर हद्दीत महादेव मंदीर आहे. गतवर्षी ग्रामस्थांनी त्याची डागडूजी केली. रंगकाम केले.कुपनलिका खोदली. परंतु, आता हे मंदिर पाण्याखाली गेले आहे. तलावाचे सुमारे 900 हेक्टर क्षेत्र गाळपेराचे आहे.
दिवाळीच्या सुटट्या असल्याने पुणे, मुंबई येथून आलेले नातेवाईक दुष्काळी पट्ट्यातील या पाण्याचा आनंद घेत पर्यटनाचा लाभ घेत आहेत. मनमुराद भिजायचे, दगडाचे चुलवान मांडायचे आणि मस्तपैकी जेवण करायचे असा बेत येथे युवक वर्गातून रंगत आहे. या तलावात बोटींग पर्यटन व्हावे अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.