परभणीत प्रतिनिधी | गजानन घुंमरे
पाथरी तालूक्यातील देवेगाव गलबे येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सदर शेतकर्याचा मृत्यू बँकेने पिककर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानेच झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यामुळे परिसरातील वातावरण तणावपुर्ण बनले आहे. देवेगाव ग्रामस्थांनी शेतकऱ्याचा मृतदेह पाथरी येथील एसबीआय बँकेसमोर आणून ठेवला असून प्रकरणामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
पाथरी तालुक्यातील देवगाव गलबे येथील शेतकरी भीमराव चव्हाण वय 53 वर्ष यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा पाथरी यांचे कर्ज होते. थकित 49 हजार रुपये भरल्यानंतर वाढीव कर्ज देऊ असे बँकेने सांगितले होते. असं आश्वासन दिल्याचं गावकरी सांगतात. त्यावर भीमराव चव्हाण यांनी खाजगी सावकाराकडून 49 हजार रुपये घेऊन बँकेच्या खात्यात भरले. बँकेच्या खात्यात पैसे भरूनही बँक कर्ज देत नाही आणि त्यामुळे चव्हाण यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत होते. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चव्हाण बँकेत आले होते. चव्हाण यांच्याकडे सावकार पैशासाठी तगादा लावत असल्याने आणि बँक पीक कर्ज देत नसल्याने ते तणावात होते. त्यातूनच चव्हाण यांना हा ऱ्हदयविकाराचा झटका आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी ग्रामस्थांनी सदरील शेतकऱ्याचा मृतदेह बँकेसमोर आणला होता .यावेळी पोलीस घटनास्थळी आले आहेत व मोठी गर्दी जमली असुन बँक परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे . मृतदेह एका खाजगी जीपमध्ये आणण्यात आला असून याच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी ठिय्या दिला आहे. विशेष म्हणजे याच बँकेच्या समोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हे प्रकरण राज्यभर त्यावेळी गाजले होते.